बॅट, रॉडने मारून श्वानाची क्रूर हत्या

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणारे तरुण पार्टी करीत गोंधळ घालत होते. त्यांना शेजारी राहणार्‍या तरुणाने समजावून सांगितले. मात्र त्यानंतर या टोळक्याने त्याच्या फ्लॅटची बाहेरून कडी लावून घेत त्यांच्या अमेरिकन पिटबुल जातीच्या कुत्रीची बॅट, रॉडने मारून क्रूरपणे हत्या केली. ही घटना सातारा परिसरातील एकता अपार्टमेंट परिसरात शनिवारी (दि. ७) मध्यरात्री १२ ते १२.३० वाजेच्या सुमारास घडली. 
या प्रकरणी गणेश जाधव यांच्या फ्लॅटमध्ये राहणार्‍या दोन ते तीन अनोळखी मुलांवर सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 रिया महादेव कराड या २० वर्षीय तरुणीच्या फिर्यादीनुसार, त्यांनी ’कॅफे’ नावाची सहा महिन्यांची अमेरिकन पिटबुल जातीची कुत्री पाळली होती. अपार्टमेंटमधील दुसर्‍या मजल्यावर राहणार्‍या एका भाडेकरूच्या खोलीत काही तरुण पार्टी करत होते. त्यांचा गोंधळ सुरु असल्याने रियाच्या भावाने त्यांना समज दिली होती. त्यानंतर काही वेळाने बाहेर कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने कुटुंबाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र बाहेरून कडी लावलेली होती. खिडकीतून पाहिले असता, पार्टीसाठी आलेले दोन ते तीन अनोळखी तरुण ’कॅफे’ला बेदम मारहाण करत असल्याचे दिसले. यावेळी एका तरुणाने धारदार शस्त्राने कुत्र्यावर वार करून तिला जागीच ठार केले.